Skip to main content

शेडनेटचे रंग, सावली गुणांकाचे पिकावर होतात परिणाम

गत पाच वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मध्यवर्ती परिसरात जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागामार्फत विविध भाजीपालावर्गीय पिके व फुलपिके यांचे संरक्षित वातावरणात प्रयोग घेण्यात आले. त्यातून उपलब्ध झालेल्या शिफारशी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील.
डॉ. सुनील गोरंटीवार

सद्यपरिस्थितीत बाजारात विविध रंगांचे व सावली गुणांक असलेले शेडनेट उपलब्ध आहेत. यातील हिरवा, पांढरा, लाल या शेडनेट रंगांचा व ३५, ५० व ७५ टक्के सावली गुणांक असलेल्या शेडनेटचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास काटेकोर शेती प्रकल्पामध्ये करण्यात आला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.

काकडी :
अ) काकडी पिकाकरिता हिरव्या, पांढऱ्या रंगाच्या ३५, ५० व ७५ टक्के सावली गुणांक असणाऱ्या शेडनेटगृहामध्ये प्रयोग घेतले. त्यात नत्र, स्फुरद व पालाश यांची शिफारशीत मात्रेच्या विविध स्तरावर ठिबक व प्रचलित पद्धतीद्वारे खते देण्याच्या पद्धतींची तुलना करण्यात आली. त्यातून काकडीच्या अधिक उत्पादनासाठी ७५ टक्के सावली गुणांकाच्या शेडनेटगृहात लागवड करून, ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या (१००: ५०: ५० किलो / हेक्टर) १२५ टक्के विद्राव्य खते (२६ समान हप्त्यांत, चार दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर १५ दिवसांनी) देण्याची शिफारस करण्यात आली.
- शेडनेटगृहात पिकाच्या परागीकरणात मर्यादा येतात, हे लक्षात घेऊन गायनोसिअस जातीची लागवड आवश्यक आहे.
- तणांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता वीडमॅट सारख्या आच्छादनाचा वापर लाभदायी ठरतो.
- काकडीच्या उन्हाळी (जानेवारी) लागवडीसाठी ०.४ x १.३ मीटर अंतरावरील पिकाचे लाभखर्च गुणांक पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ब) वरील प्रयोगाचा निष्कर्ष लक्षात घेता, काकडी पिकाकरिता वरील प्रकारच्या शेडनेटमध्ये पिकाच्या पाण्याची आवश्यकता काढण्यात आली. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या १२५ टक्के विद्राव्य खते (१२५ : ६२.५ : ६२.५) २६ समान हप्त्यांत चार दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर पिकाच्या (गायनोसिअस) जातीकरिता देण्यात आली. तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंदेरी-काळ्या रंगाच्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला होता.
दोन वर्षांच्या प्रयोगाअंती ५० टक्के सावली गुणांक असलेल्या लाल रंगाच्या शेडनेटगृहात लागवड करून चंदेरी-काळ्या रंगाच्या प्लास्टिक अाच्छादनाचा वापर केल्यास व ठिबक सिंचन पद्धतीने बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ६० टक्के पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळत असल्याचे आढळले. तसेच, उपलब्ध हिरवे पांढरे शेडनेटगृहात देखील बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ६० टक्के पाणी देण्याची शिफारस करण्यात आली.

कांदा : कांदा पिकाच्या शेडनेटगृहामधील लागवडीचे प्रयोग करण्यात आले. मात्र, हिरव्या- पांढऱ्या शेडनेटगृहामध्ये कांद्याची अनियमित वाढ होऊन, उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. शेडनेटगृहात कांदा लागवड करू नये, अशी शिफारस करण्यात आली.

झेंडू : झेंडू पिकाच्या (आॅगस्ट लागवड) ‘के वाय-६’ जातीकरिता विविध रंगांच्या व सावली गुणांकांच्या शेडनेटमध्ये केलेल्या अभ्यासात, ५० टक्के सावली गुणांक असलेल्या लाल शेडनेटगृहात ०.६५ x ०.३ मीटर अंतरावर लागवड व ठिबक सिंचनाद्वारे प्रतिदिन बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ०.१८५ (ETr) या मात्रेत सिंचन केल्यास झेंडू पिकापासून अधिक उत्पादन, नफा मिळतो व पाण्याचा कार्यक्षम वापर होत असल्याचे अाढळून आले.

ढोबळी मिरची :
अ) विविध सावली गुणांकाच्या शेडनेट (७५, ५०, ३५ टक्के), तसेच ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७५ टक्के, ५५ टक्के व ३५ टक्के) या उपचारांचा ढोबळी मिरची पिकावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. चंदेरी व काळ्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर व पाण्यात विरघळणारी खते दिवसाआड सर्व उपचारांमध्ये दिली. अशा सलग दोन वर्षांच्या अभ्यासातून खालील शिफारस केली.
चांगल्या प्रतीच्या ढोबळी मिरचीच्या (आॅक्टोबर लागवड) अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ७५ टक्के सावलीच्या शेडनेटगृहात लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे दररोज पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ७५ टक्के पाणी देण्याची शिफारस करण्यात आली.
ब) ढोबळी मिरची पिकासाठी नैसर्गिक वायुसंचरित हरितगृहामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७० टक्के व ४५ टक्के) व खतांच्या विविध मात्रा (शिफारशीत खत मात्रेच्या १२५ टक्के, १०० टक्के व ७५ टक्के) यांचे प्रयोग झाले. यात खते दिवसाआड देण्यात येत असून, चंदेरी व काळ्या प्लास्टिकचे आच्छादन केले होते.
शिफारस - हिरव्या ढोबळी मिरचीच्या आॅक्टोबर लागवडीमध्ये ठिबक सिंचनातून पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ७० टक्के पाणी प्रतिदिन आणि शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के विद्राव्य खते (फळे येण्यापूर्वी ८ : २.८ : ४ : २.८ : ०.२ किलो प्रतिहेक्टर आणि फुले आल्यानंतर ६ : ३ : १५ : ३ : ०.३ किलो प्रतिहेक्टर नत्र- स्फुरद- पालाश- कॅल्शियम- मॅग्नेशियम) दिवसाआड ठिबक सिंचनाद्वारे देण्याची शिफारस करण्यात आली.

सध्या सुरू असलेले प्रयोग -
याचबरोबर सध्या खालील विविध पिकांवर संशोधन सुरू असून, लवकरच त्यावरील शिफारशी सादर करण्यात येतील.

खरबूज : प्रामुख्याने खरबूज पीक मोकळ्या जागेत घेण्यात येते. तथापि अधिक उत्पादन व उच्च प्रतीच्या खरबूज उत्पादनाकरिता या विभागाने चंदेरी-काळ्या प्लास्टिक अाच्छादनाचा वापर करून पिकाची विविध रंगाच्या शेडनेटगृहात (लाल, हिरव्या, पांढऱ्या) व विविध सावली गुणांक असलेल्या शेडनेटगृहामध्ये खत व पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयोग घेण्यात आला. प्रथम वर्ष प्रयोग पूर्ण झालेला असून योग्य शिफारशीकरिता पुढील चाचणी करण्यात येत आहे.

टोमॅटो :
अ) विविध सावली गुणांकाच्या शेडनेट (७५, ५०, ३५ टक्के), तसेच ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७५ टक्के, ५५ टक्के व ३५ टक्के) या उपचारांचा टोमॅटो पिकावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास चालू आहे. चंदेरी व काळ्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर व पाण्यात विरघळणारी खते दिवसाआड सर्व उपचारांमध्ये दिली जात आहेत.

ब) टोमॅटो पिकासाठी नैसर्गिक वायुसंचरित हरितगृहामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७० टक्के व ४५ टक्के) व खतांच्या विविध मात्रा (शिफारशीत खत मात्रेच्या १२५ टक्के, १०० टक्के व ७५ टक्के) यांचा प्रतिसाद पडताळणी चालू आहे. खते दिवसाआड देण्यात येतात व चंदेरी व काळ्या प्लास्टिकचा आच्छादनासाठी वापर सर्व उपचारांमध्ये केला जातो.

लाल कोबी :
अ) विविध सावली गुणांकाच्या शेडनेट (७५, ५०, ३५ टक्के), ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७५ टक्के, ५५ टक्के व ३५ टक्के), तसेच शिफारशीत खतमात्रेच्या विविध पातळ्या (१२५, १०० व ७५ टक्के) या उपचारांचा लाल कोबी पिकावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास चालू आहे. चंदेरी व काळ्या प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर सर्व उपचारांमध्ये करण्यात येत आहे.

ब) लाल कोबी पिकासाठी नैसर्गिक वायुसंचरित हरितगृहामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७० टक्के व ४५ टक्के) व खतांच्या विविध मात्रा (शिफारशीत खत मात्रेच्या १२५ टक्के, १०० टक्के व ७५ टक्के) यांचा प्रतिसाद पडताळणे चालू आहे. खते दिवसाआड देण्यात येतात व चंदेरी व काळ्या प्लास्टिकचा आच्छादनासाठी वापर सर्व प्रयोगांमध्ये केला जातो.

ब्रोकोली : विविध रंगांच्या शेडनेटगृहामध्ये ब्रोकोली पिकाचा (रब्बी व उन्हाळी हंगाम) प्रतिसाद तपासणे सुरू आहे. यामध्ये पांढरी, लाल, हिरवी, हिरवी + पांढरी व नेटविरहित वातावरणामध्ये प्रयोग घेण्यात येत आहेत. यामध्ये खते (शिफारस मात्रेच्या ६० टक्के, ८० टक्के व १०० टक्के) याबरोबर सिंचनाची बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ६०, ७०, ८०, ९० टक्के मात्रा दिली जात आहे.

डॉ. सुनिल गोरंटीवार, ९८८१५९५०८१
(काटेकोर शेती विकास केंद्र, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी)

Comments

Popular posts from this blog

डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. राजू गाडेकर, संगमनेर

डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत ,  गणेश व जी - १३७ ,  आरक्त्त ,  मृदुल ,  शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे ,  त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब   लागवडी खालील   क्षेत्र   खूप   वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात) ,  ज्योती (कर्नाटक) ,  जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी ,  १.९ प्रथीने ,  १.७% स्निग्ध पदार्थ ,  १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १० ,  फॉस्फरस ७० ,  लोह ०.३० ,  मॅग्नेशियम १२ ,  सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६ ,  रिबोफ्लेवीन ०.१ ,  नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळिंब हे पूर्णतः सदा...

जीवामृत

जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:          200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व   संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :   पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड   व नंत...

दशपर्णी अर्क

200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. . ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी      हे मिश्रन चांगले ढवळा , व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि . तंबाखू पावडर + 1 कि . तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात      2 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि . करंजी ची पाने +      2 कि . सीताफळाची पाने + 2 कि . धोतऱ्यायाची पाने + 2 कि . येरंडीची...