कोल्हापूर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एकदा झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांनी दिली. तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत चालले आहे. याला एकच पर्याय म्हणजे सुभाष पाळेकर यांची शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हा आहे. या शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन स्वतः श्री. पाळेकर देशात तसेच परदेशात शिबिरांच्या माध्यमातून करत आहेत. देशातील तसेच परदेशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान कसे पोचवता येईल, या विचारातून कोल्हापुरात 24 ते 26 फेब्रुवारीअखेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आध्यात्मिक मार्गदर्शक संजीव कुलकर्णी, तानाज...